Raybag

रायबागमध्ये कृष्णा नदीकाठावर भूस्खलन

Share

रायबाग तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर अचानक मोठी जमीन खचल्याची घटना घडली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील कुडची मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या परमानंदवाडी आणि शिरगूर गावाजवळ ही घटना घडली. कृष्णा नदीचा कडा कोसळल्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले असून तेथे बसवलेले पंपसेट, विजेच्या केबल्स आणि पाण्याचे पाईप्स वाहून गेले आहेत. यामध्ये आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच कुडचीचे आमदार महेंद्र तम्मण्णावर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

भूस्खलनामुळे झालेल्या या नुकसानीची माहिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन आमदार महेंद्र तम्मण्णावर यांनी दिले.

Tags: