Politics

राजकारणाऐवजी जनतेच्या कल्याणासाठी एकत्र काम करूया

Share

राज्याच्या आणि जनतेच्या कल्याणासाठी सर्वांनी हेवेदावे विसरून एकत्र काम करावे, राजकारण करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे. विधानसौधमध्ये माजी मुख्यमंत्री देवराज अरासू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी मुख्यमंत्री देवराज अरासू यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त विधानसौधच्या आवारातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अरासू यांनी केलेली कामे पुढील १०० वर्षे लोकांच्या स्मरणात राहतील आणि त्यांनी दिलेले योगदान आपल्यासमोर आहे, असे सांगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देवराज अरासू यांनी कर्नाटकात आणलेला ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा देशासाठी आदर्श ठरला, असे डी. के. शिवकुमार यांनी म्हटले. तसेच त्यांच्याच विचारांवर आपले सरकार पुढे काम करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकातील काँग्रेसच्या कारभारामुळे जनता संकटात असल्याच्या पंतप्रधानांच्या टीकेला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले. पंतप्रधान मुख्यमंत्री झाले तेव्हा आपण त्यांचे अभिनंदन केले होते आणि त्यांनीही आभार मानले होते, अशी आठवण सांगून आगामी काळात आपण त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधानांनीही राजकारण करू नये आणि आम्हीही राजकारण करणार नाही, आपण सर्वांनी मिळून राज्याच्या हितासाठी काम करूया, असे आवाहन डी. के. शिवकुमार यांनी केले.

मंत्री रामलिंगारेड्डी आपले मित्र असून त्यांच्याशी चर्चा झाली आहे, त्यांनी व्हॉट्सॲपवर राजीनामा पाठवला होता, मात्र आता हा वाद पूर्णपणे मिटला आहे, अशी माहिती डी. के. शिवकुमार यांनी दिली. देवराज अरासू यांनी स्वतः राजघराण्यातील असूनही विविध जातींमधील नवीन नेत्यांना पुढे आणले, तसेच बंगळुरूमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक सिटी’ची पायाभरणी देवराज अरासू यांनीच केली असून त्या वेळी वीरप्पा मोईली आणि एस. एम. कृष्णा हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, असे डी. के. शिवकुमार यांनी म्हटले.

Tags: