बेळगावमधील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावर टिळकवाडी पोलिसांनी छापा टाकला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास तीव्र केला असून, कंपनीचा मालक बलराज माने याला अटकेची भीती सतावत आहे.

बेळगावमध्ये आणखी एक मोठे फसवणूक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. फसवणुकीचे आरोप असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होताच टिळकवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या कारवाईमुळे मुख्य संशयित बलराज माने सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.

बेळगावमधील भाग्यनगर भागातील या कंपनीचे कार्यालय कालच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सील करण्यात आले होते. मात्र, आज तपास अधिकारी, साहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक आणि गुन्हे शोध तज्ज्ञांच्या टीमने हे कार्यालय पुन्हा उघडून कसून तपासणी सुरू केली आहे.
कार्यालयातील संगणक, लॅपटॉप आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. संध्याकाळपर्यंत पंचनामा करून सर्व डिजिटल पुरावे जप्त करण्यात येतील. टिळकवाडी पोलीस ठाण्यात बलराज माने याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने शिवानंद नीलण्णावर फसवणूक प्रकरणाप्रमाणेच हा तपासही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Recent Comments