gokak

गोकाकमध्ये ‘डेथ नोट’ लिहून तरुणाची आत्महत्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बेंडिगेरी गावात एका व्यक्तीने डीवायएसपी आणि पीएसआय यांच्यासह इतरांची नावे पत्रात लिहून गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस आणि कर्जदारांकडून न्याय न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

मृताचे नाव रवींद्र दानव्वागोळ असे असून त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात, आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यामुळे हे कठीण पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.

पत्रात लक्ष्मण चंदरगी आणि भरमप्पा पूजारी यांच्याकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख असून, कर्जाची रक्कम परत मागताना आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप रवींद्र यांनी केला आहे. तसेच, या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही आपल्याला न्याय मिळाला नाही, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

याशिवाय, पीएसआय आनंद आणि तत्कालीन डीवायएसपी मुल्ला यांच्याकडूनही आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप रवींद्र यांनी पत्रात केला आहे. रवींद्र यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

मूडलगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मुदळगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आत्महत्या पत्राची सत्यता आणि आरोपांबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: