Bagalkot

बागलकोटमध्ये पीक विम्याच्या नावाखाली ३० कोटींचा डल्ला

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळमध्ये केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘फसल विमा’ योजनेला घरघर लागल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

मुधोळ तालुक्यात प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या पत्राद्वारे या घोटाळ्याची माहिती समोर आली. पीक विम्यासाठी बनावट फोटो वापरून आणि प्रत्यक्षात पीक नसतानाही विमा लाटून २०२०-२१ पासून आतापर्यंत ३० कोटी २८ लाख ५१ हजार ५८० रुपयांची लूट करण्यात आली आहे.

या घोटाळ्याप्रकरणी मुधोळ कृषी विभागाचे सहाय्यक संचालक सिद्धलिंगेश दोडमणी यांनी तक्रार दाखल केली असून, एकूण ११ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मेटगुड्डा गावातील ७ जण आणि युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, यशवंत, राकेश, प्रकाश आणि अनिल या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

या मोठ्या घोटाळ्यात अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. बोगस लाभार्थ्यांच्या नावावर सरकारी निधी हडप करणाऱ्या या साखळीचे धागेदोरे शोधण्यासाठी विशेष पथक कार्यरत झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

Tags: