देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानावरच स्वगावी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बागलकोट जिल्ह्यात समोर आली आहे. बनहट्टी तालुक्यातील नंदगावमध्ये दुर्गादेवी यात्रेच्या प्रसादावरून झालेल्या वादात एका जवानाला बेदम मारहाण करण्यात आली असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी तालुक्यातील नंदगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली. सुट्टीवर गावी आलेल्या श्रीनिवास गस्ती या जवानावर विठ्ठल म्यागडी आणि त्याच्या मुलांनी अचानक हल्ला केला. श्री दुर्गादेवी यात्रेदरम्यान प्रसादाची चोरी होत असल्याचा जाब श्रीनिवास यांनी विचारला होता, ज्याचे रूपांतर वादात आणि नंतर हल्ल्यात झाले.
या भीषण हल्ल्यात जवान श्रीनिवास गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “देशाचे रक्षण करणाऱ्या माझ्यावरच अशा प्रकारे हल्ला झाला, मला न्याय मिळावा,” अशी आर्त हाक श्रीनिवास यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
याप्रकरणी जवानाची पत्नी आशा गस्ती यांनी महालिंगपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. श्रीनिवास गस्ती यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध विठ्ठल बेळगावकर यांनी व्यक्त केला.


Recent Comments