बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील आसंगी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या कारणावरून झालेल्या वादानंतर प्रेयसीने राहत्या घरी आत्महत्या केली, ही बातमी समजताच प्रियकरानेही आपले जीवन संपवले. या दुहेरी आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

एकाच गावातील असलेल्या या तरुण-तरुणीच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. मात्र, काल दोघांमध्ये झालेल्या एका वादामुळे या प्रेमकहाणीचा अंत अत्यंत दुर्दैवी झाला. प्रेयसीने रात्री गळफास घेतल्याचे समजताच प्रियकरानेही मृत्यूला कवटाळले.
एकीकडे प्रेमात असतानाचा या प्रेमी युगुलाचा आनंदी फोटो आणि दुसरीकडे दोघांच्या आत्महत्येमुळे पडलेले त्यांचे मृतदेह, असे विदारक दृश्य आज आसंगी गावात पाहायला मिळाले. बागलकोट जिल्ह्यातील आसंगी येथील १९ वर्षीय पवित्रा हिने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी वार्यासारखी पसरली आणि तिचा प्रियकर २१ वर्षीय कार्तिक याला समजली. प्रेयसीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने कार्तिकनेही आत्महत्येचे पाऊल उचलले. काल दुपारी दोघांमध्ये लग्नाच्या कारणावरून काही वाद झाले होते, ज्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. काल त्यांच्यात लग्नाबाबत चर्चा झाली, मात्र कौटुंबिक विरोध आणि वादातून पवित्राने जीवन संपवले. ही माहिती मिळताच भीतीने आणि दुःखाच्या भरात कार्तिकनेही स्वतःला संपवून घेतले. घटनेची माहिती मिळताच बनहट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अद्याप मृतांच्या नातेवाईकांनी अधिकृत तक्रार दिलेली नाही. मात्र, तक्रार प्राप्त होताच या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती बागलकोटचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी दिली.
ज्या वयात स्वतःचे भविष्य घडवायचे होते, त्या वयात या प्रेमी युगुलाने घेतलेल्या घाईच्या निर्णयामुळे दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेने आसंगी गाव सुन्न झाले असून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments