चिकोडी येथील आर. डी. हायस्कूलच्या मैदानावर ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी (एसी) सुभाष संपगावी यांच्या हस्ते अधिकृत ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर बोलताना उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी, हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी तरुणांना संबोधित केले. संविधानाला धोका निर्माण झाल्यास तरुणांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गणेश हुक्केरी यांनी चिकोडी शहराला स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून लवकरच ही घोषणा केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्यात विविध शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर नृत्ये सादर केली. कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब वड्डर, डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर, तहसीलदार राजेश बुर्ली यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments