बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टीमध्ये दर्ग्याच्या जमिनीच्या क्षेत्रफळात करण्यात आलेल्या बदलाच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने तहसील कार्यालयावर धडक दिली. सरकारी नोंदीमध्ये फेरफार करून दर्ग्याची जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.


सवदत्ती तालुक्यातील यरगट्टी मधील बाबाबुडन शावली दर्गा ट्रस्टच्या मालकीच्या सर्व्हे नंबर ७/१ आणि ७/२ मधील जमिनीच्या नोंदीत बेकायदेशीरपणे फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मूळची ८ गुंठे असलेली दर्ग्याची जागा कागदपत्रांमध्ये केवळ ५ गुंठे दाखवण्यात आली आहे. हा जमिनीचा भाग हडपण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट असून, सरकारी कागदपत्रांमधील ही तफावत तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनादरम्यान मुस्लीम समाजाचे नेते आणि दर्गा ट्रस्टच्या सदस्यांनी तहसीलदारांमार्फत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले. बदलण्यात आलेले जमिनीचे क्षेत्रफळ पुन्हा मूळ नोंदीनुसार करण्यात यावे, अन्यथा आगामी काळात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी दर्ग्याच्या जमिनीचे संरक्षण करण्याची मागणी करत न्यायासाठी घोषणाबाजी केली.


Recent Comments