पंचमसाली पीठाचे जयमृत्युंजय स्वामीजी यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर समाजनेते विजयानंद काशप्पनवर आक्रमक झाले आहेत. स्वामीजींचे अनैतिक संबंध आपल्याला आधीच माहित होते, म्हणूनच त्यांना पीठापासून दूर ठेवले होते, असा खळबळजनक आरोप काशप्पनवर यांनी केला आहे.

बागलकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयानंद काशप्पनवर यांनी जयमृत्युंजय स्वामीजींवरील लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून संताप व्यक्त केला. ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी अनेकांनी मला फोन करून माहिती दिली होती. स्वामीजींनी असे अनैतिक संबंध एकदा नाही, तर अनेकवेळा ठेवले आहेत. समाजाचा पैसा वापरून त्यांनी मोठी मालमत्ता उभी केली आहे. बसवण्णांचे पवित्र ऐक्य स्थळ अपवित्र होऊ नये, याच कारणासाठी आम्ही त्यांना यापूर्वीच पीठातून बाहेर काढले होते, असे विजयानंद काशप्पनवर यांनी म्हटले.
स्वामीजींच्या वागणुकीवर टीका करताना काशप्पनवर यांनी पीठाच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. २०१७ पासूनच आम्हाला त्यांच्या कारवायांची कल्पना होती. समाजाची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आम्ही गप्प होतो. मात्र, आता अन्यायग्रस्त महिला न्याय मागत आहे. जर त्यांचे चारित्र्य स्वच्छ होते, तर त्यांना कोर्टातून स्थगिती आणण्याची गरज काय होती? असा सवाल विजयानंद काशप्पनवर यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी स्वामीजींचे समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला. बसनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद आणि सी. सी. पाटील यांसारखे नेते त्यांना सोबत घेऊन फिरत होते, आता त्यांनीच जनतेला उत्तर द्यावे. त्यांच्यासाठी वेगळा मठ बांधू म्हणणाऱ्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही आधीच त्यांच्याशी संबंध तोडले आहेत, असे विजयानंद काशप्पनवर यांनी म्हटले.


Recent Comments