बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोंढा गावात इस्टर सणाच्या निमित्ताने फटाके वाजवण्यावरून दोन गटांत भीषण संघर्ष झाला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोंढा येथील चर्च गल्लीत ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. संतोष ऊर्फ पीटर जॉन्सन अरेकर आणि त्यांचा भाऊ रॉबिन जॉन्सन हे आपल्या घरासमोर इस्टर सणानिमित्त फटाके वाजवत होते. यावेळी जॉन्सन पुलामीन डिकोस्टा यांच्यासह पाच जणांनी तिथे येत फटाके वाजवण्यास आक्षेप घेतला. इस्टर कालच संपला असताना आज फटाके का वाजवता, असा सवाल करत त्यांनी वाद उकरून काढला. शाब्दिक चकमकीतून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.
संबंधित आरोपींच्या गटाने तक्रारदारांना बेदम मारहाण केली असून, रॉबिन जॉन्सन यांच्या डोक्यात विटेने प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. पुन्हा फटाके वाजवल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सपाटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments