बागलकोट पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पराभवाच्या भीतीने हताश झालेले भाजप नेते केवळ खोट्या आश्वासनांचा आधार घेत असल्याची टीका करत मुख्यमंत्र्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आज दुपारी बागलकोट हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी आणि आर.बी. तिम्मापूर उपस्थित होते. दवणगिरी येथून हेलिकॉप्टरने आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध मुचखंडी वीरभद्रेश्वर मंदिरात जाऊन विशेष पूजा केली.

दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला कोणतीही नैतिकता उरलेली नाही आणि पराभवाच्या छायेमुळे त्यांचे नेते हताश झाले आहेत. ज्यांना पक्षातून बाहेर काढले होते, त्यांनाच पुन्हा बोलावून प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले.

केंद्रीय मंत्री वि. सोमण्णा यांच्या विधानांचा समाचार घेताना, सोमण्णा हे काम नसलेले मंत्री असून त्यांना माझ्या पदाबाबत डेडलाईन देण्याचा कोणताही अधिकार नाही. ते काँग्रेस हायकामंड नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तर दिले.
निवडणूक प्रचारासाठी वेळ नसलेले भाजप नेते केवळ दिशाभूल करत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनता गॅरंटी योजनांच्या लाभासह काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.
हायकमांड जो निर्णय घेईल त्याला आपण बांधील आहोत. भाजपच्या खोट्या प्रचाराला मतदार बळी पडणार नाहीत आणि मुचखंडी वीरभद्रेश्वराच्या आशीर्वादाने प्रचाराचा दुसरा टप्पा यशस्वी होईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.


Recent Comments