बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीचे रणकंदन आता अधिक तीव्र झाले असून राष्ट्रीय पक्षांच्या मक्तेदारीला उत्तर कर्नाटक शेतकरी संघटनेने आव्हान दिले आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद जकाती यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस आणि भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
बागलकोट पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आता नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. उत्तर कर्नाटक शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बसवराज करिगार यांनी या भूमिकेवर स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय पक्षांकडून शेतकरी वर्गाची सातत्याने उपेक्षा होत असल्याचा घणाघात केला.
शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी संघटनेने थेट निवडणूक लढवणे काळाची गरज असल्याचे बसवराज करिगार यांनी म्हटले.
या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनेने बागलकोट जिल्हाध्यक्ष आनंद जकाती यांना अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. येत्या २० मार्च रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आनंद जकाती आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या शक्तिप्रदर्शनामुळे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी मतांचे ध्रुवीकरण झाल्यास प्रस्थापित पक्षांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागेल, असा सूर बागलकोटमधील राजकीय वर्तुळात उमटत आहे.


Recent Comments