खानापूर तालुक्यातील लोंडा आणि गुंजी रेल्वे स्थानकांदरम्यान आज पहाटे बेंगळुरू-बेळगाव अंगडी एक्सप्रेसला रानगव्याची जोरदार धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूहून बेळगावकडे येत असलेली अंगडी एक्सप्रेस पहाटे पाचच्या सुमारास लोंडा-गुंजी मार्गावरून जात असताना जंगलातून आलेल्या एका रानगव्याने रेल्वेला भीषण धडक दिली. या धडकेत रानगव्याचा रेल्वे रुळावरच मृत्यू झाला. योगायोगाने याच रेल्वेतून खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर प्रवास करत होते. रेल्वे अचानक थांबल्याने त्यांनी तात्काळ खाली उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि खानापूरच्या एसीएफ सुनीता निंबरगी यांना घटनेची कल्पना दिली.
आमदारांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे रुळावर पडलेला रानगव्याचा मृतदेह बाजूला सारून रेल्वे मार्ग मोकळा करण्यात आला. वनविभागाच्या तत्परतेमुळे काही वेळातच रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली असून रेल्वे बेळगावकडे रवाना झाली आहे.


Recent Comments