Bagalkot

बागलकोटमध्ये पीक विम्याच्या नावाखाली ३० कोटींचा महाघोटाळा

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बनावट कागदपत्रे सादर करून सुमारे ३० कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला असून, याप्रकरणी मुधोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुधोळ तालुका कृषी विभागाचे सहाय्यक संचालक सिद्धलिंगेश दोडमणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विमा कंपनीचे कर्मचारी आणि काही प्रभावशाली व्यक्तींनी संगनमत करून सरकारला ३०,२८,५೧,५८० रुपयांचा चुना लावला आहे. या प्रकरणी मेटगुडा गावातील सात जणांसह युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांवर, अशा एकूण ११ जणांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट २०२०-२१ पासून सातत्याने कार्यरत होते. प्रत्यक्षात शेतात पीक नसताना किंवा अत्यल्प क्षेत्रात पीक असतानाही, कागदोपत्री मोठी लागवड दाखवून विम्याची रक्कम लाटण्यात आली. मेटगुडा येथील कल्लाप्पा हुणशिकाट्टी, श्रीनिवास पाटील, कल्मेश जुन्नूर यांच्यासह सात स्थानिक आणि विमा कंपनीचे यशवंत, राकेश, प्रकाश आणि अनिल हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. केवळ या वर्षातच सुमारे २८.५१ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांमधील पारदर्शकतेच्या अभावाचा फायदा घेऊन या टोळीने सरकारी तिजोरीला मोठा फटका दिला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुधोळ पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून, यामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags: