बळगाव शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या बसवण कुडची येथे शनिवार, १४ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत श्री बसेश्वर, श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव यात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या या गावात गेल्या सातशे वर्षांपासून ही ऐतिहासिक परंपरा जपली जात आहे. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इंगळयांच्या विधीसाठी लागणारी लाकडे आणण्याची पद्धत. १४ मार्च रोजी गावातील सुमारे ४० विशेष लाकडी गाड्यांची पूजा करून ग्रामस्थ काकती डोंगराकडे प्रयाण करतील. देवाचा गाडा या बेडका कुटुंबाच्या गाड्याच्या नेतृत्वाखाली हा ताफा १५ किमीचा प्रवास अनवाणी पायी पूर्ण करतो. तेथून जांभळाच्या झाडाची लाकडे गोळा करून शनिवारी सायंकाळी या गाड्यांचे गावात पुनरागमन होते.
सोमवार, १६ मार्च रोजी सकाळी अभिषेक पूजन आणि शृंगारलेल्या गाड्यांची मंदिरातून प्रदक्षिणा घातली जाईल. त्यानंतर आंबील आणि घुगर्यांचा नैवेद्य दाखवून प्रसादाचे वाटप केले जाते. शेतात या गाड्यांच्या शर्यती पार पडतात, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मंगळवारी, १७ मार्च रोजी यात्रेचा मुख्य इंगळयांचा विधी पार पडणार आहे.
यात्रोत्सवाच्या सांगता सोहळ्यात बुधवारी भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. गुरुवारी युगादी पाडव्यानिमित्त पंचांग वाचन, बालशिवाजी मेळा पथकाची लाठी प्रात्यक्षिके असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


Recent Comments