बागलकोटमध्ये दगडफेकीच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण असतानाच, जमावबंदी लागू असूनही हिंदू संघटनांनी आज दुपारी भव्य हिंदू संमेलन आयोजित करण्याचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनांनी जिल्हा प्रशासनाला सायंकाळपर्यंतची मुदत दिली आहे.


बागलकोट शहरात शांतता राखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र, पूर्व नियोजित ‘हिंदू संमेलन’ कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आज दुपारी ३ वाजता नवनगरमधील ३० व्या सेक्टरमधील उद्भव गणपती मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात होणार असून, सेक्टर ५२ मधील वीरभद्रेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप होईल.

यानंतर जाहीर सभा होणार असून, विविध मठाधिपती, राजकीय नेते आणि हिंदू संघटनांचे पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत.
संमेलनाबाबत आधीच पोलिसांना कळवण्यात आले असल्याचे संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या मागण्यांच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळपर्यंतचा ‘डेडलाईन’ दिली आहे.
दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दोन वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संमेलनाच्या मार्गावर पोलीस बारीक लक्ष ठेवून असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.


Recent Comments