हुंडाबळी सारखी सामाजिक अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकण्यासाठी बागलकोट तालुक्यातील मुचखंडी एल.टी. गावातील तरुणांच्या लग्नासाठी एक रुपयाही हुंडा घेणार नाही, अशी घोषणा गावातील ज्येष्ठांनी आणि स्वामीजींनी जाहीरपणे केली असून एका नवीन सामाजिक क्रांतीला सुरुवात केली आहे.

सुमारे २ हजार लोकसंख्या असलेल्या मुचखंडी एल.टी. गावात यापूर्वी लग्नामध्ये १० ते १५ लाख रुपये रोख आणि सोने देण्याची प्रथा होती. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या सागर राठोड आणि काव्या यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने या प्रथेला पूर्णविराम देण्यात आला आहे. सागर यांची आई कमलाबाई यांनी ‘हुंडा न घेता सून घरी आणण्याचे’ पाहिलेले स्वप्न त्यांचे मुले राघवेंद्र आणि गिरीश यांनी पूर्ण केले असून, संपूर्ण गावाने या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
साखरपुड्याच्या कार्यक्रमातच गावातील ज्येष्ठांनी माईक हातात घेऊन, “यापुढे या गावात होणाऱ्या कोणत्याही लग्नासाठी हुंडा घेतला जाणार नाही,” अशी घोषणा केली. या घोषणेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या मुलींच्या लग्नातही याच साधेपणाचे पालन करावे, असे आवाहन गावकऱ्यांनी एकमेकांना केले आहे. अनुसूचित जातीच्या समुदायाची बहुसंख्या असलेल्या या गावातील ज्येष्ठांनी उचललेले हे पाऊल संपूर्ण समाजासाठी एक मोठा संदेश देणारे ठरले आहे.


Recent Comments