बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यात साखर कारखान्यातून इथेनॉल घेऊन तमिळनाडूकडे जाणाऱ्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा १६ चाकी ट्रक रस्त्यावरच पालथा झाला, मात्र प्रशासकीय यंत्रणेने दाखवलेल्या प्रसंगवधामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील सैदापूर क्रॉसजवळ आज पहाटे हा अपघात घडला. स्थानिक साखर कारखान्यातून इथेनॉलचा साठा घेऊन तमिळनाडूच्या दिशेने निघालेल्या १६ चाकी ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावरच उलटले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच महालींगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इथेनॉल अत्यंत ज्वलनशील असल्याने ट्रक उलटल्यामुळे मोठी गळती होऊन आगीचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने हालचाली करत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आणि संभाव्य धोका यशस्वीपणे रोखला.
प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगवधामुळे या भीषण अपघाताचे रूपांतर मोठ्या दुर्घटनेत झाले नाही. सध्या महालींगपूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.


Recent Comments