बागलकोट जिल्ह्यात मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे सिम कार्ड बदलणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले असून, त्याचे लाखो रुपये लंपास झाले आहेत. उसाचे पीक विकून कर्ज फेडण्यासाठी ठेवलेली रक्कम चोरांनी क्षणार्धात पळवल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे.

बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील हावरगी गावातील शेतकरी शरणप्पा संगप्पा गाळी हे या डिजिटल दरोड्याचे बळी ठरले आहेत. त्यांच्या ग्रामीण बँक खात्यात उसाचे बिल म्हणून जमा झालेल्या ३ लाख रुपयांवर सायबर चोरांनी डोळा ठेवला होता. मोबाईलमध्ये ‘नो सर्व्हिस’ येत असल्याने शरणप्पा यांनी इळकल येथील एअरटेल कार्यालयातून डुप्लिकेट सिम कार्ड घेतले होते. सिम कार्ड सक्रिय झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्यांच्या दोन बँक खात्यांतून टप्प्याटप्प्याने पैसे काढून घेण्यात आले.
चोरांनी शरणप्पा यांच्या ग्रामीण बँक खात्यातून ९९,९९९ रुपये आणि स्टेट बँक खात्यातून ८४,००० रुपये असे एकूण १,८३,९९९ रुपये फोन पे द्वारे एम. डी. रशीद खान नामक व्यक्तीच्या खात्यात वर्ग केले. बँकेचे स्टेटमेंट तपासल्यानंतर ही फसवणूक उघड झाली. हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याने तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली आहे. सध्या हुनगुंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित बँक खाते गोठवण्यात आले आहे. सिम कार्ड किंवा तांत्रिक बदलांच्या वेळी शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Recent Comments