बागलकोट मधील जमखंडी तालुक्यातील एका सरकारी शाळेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांना चक्क सांडपाण्यात माध्यान्ह भोजनाची ताटं धुवावी लागत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

बागलकोट मधील जमखंडी तालुक्यातील अलबाळ गावात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळेत माध्यान्ह भोजनानंतर ताटं धुण्यासाठी स्वच्छ पाण्याची कोणतीही सोय नसल्याने, सांडपाणी वाहणाऱ्या जागेतच पिण्याच्या पाण्याचे नळ बसवण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त सांडपाण्यात उभे राहूनच आपली ताटं स्वच्छ करावी लागत आहेत.
या संतापजनक दृश्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. ही केवळ निष्काळजी नसून मुलांच्या हक्कांचे आणि आरोग्याचे उल्लंघन आहे, त्यामुळे शिक्षण मंत्री आणि महिला व बाल कल्याण विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी शिवलींग निंगनूर यांनी केली आहे. शाळा व्यवस्थापनाच्या या भूमिकेचा नागरिकांनी निषेध केला असून, मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या संतापजनक घटनेची शिक्षण समन्वयकांमार्फत चौकशी करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी अस्वच्छ पाण्याच्या पाईपजवळ ताटं धुतल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेच्या आवारात पिण्याच्या पाण्याची सोय असतानाही हा प्रकार घडणे हे मुख्याध्यापकांचा निष्काळजीपणा दर्शवते. याप्रकरणी मुख्याध्यापकांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल असे अशोक बसनवर यांनी म्हटले.
शाळा परिसरातील सांडपाण्याची जागा दुरुस्त करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. जर ग्रामपंचायतीने ही दुरुस्ती करण्यास विलंब केला, तर शालेय अनुदानातून ही व्यवस्था तातडीने सुधारली जाईल. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.


Recent Comments