कर्नाटक विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या निलंबनाच्या मागणीसाठी भाजप आणि जेडीएसने मंगळवारी विधानसौध येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने केली.


काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी राज्यपालांना दिलेल्या वागणुकीचा निषेध केला आणि न्यायाची मागणी केली. अबकारी विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणी मंत्री आर. बी. थिम्मापूर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी करत विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून सरकारवर ताशेरे ओढले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते छळवादी नारायणस्वामी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, सी. टी. रवी यांच्यासह भाजप आणि जेडीएसचे आमदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, अबकारी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असलेल्या ६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे पुरावे समोर आले आहेत, मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यावर सभागृहात चर्चा करण्यास तयार नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करणे हाच एकमेव पर्याय आहे. सिद्धरामय्या सरकार हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करत असून आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी लढा सुरूच ठेवू, असे बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटले.
याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते छलवादी नारायणस्वामी यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनीही सरकारवर सडकून टीका केली.


Recent Comments