Bagalkot

महालिंगपूर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी जनआक्रोश

Share

बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या बंदमुळे शहरात प्रचंड तणाव पाहायला मिळाला. सकाळपासून सुरू झालेले हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

रबकवी-बनहट्टी तालुक्यातील महालिंगपूरला नवा तालुका म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी ‘तालुका संघर्ष समितीच्या’ वतीने आज भव्य आंदोलन छेडण्यात आले. आंदोलकांनी महालिंगपूर शहरात कडकडीत बंद पाळून मुख्य रस्त्यांवर टायर जाळून सरकारचा निषेध केला. रात्री उशिरापर्यंत आंदोलक रस्त्यावरच ठाण मांडून बसल्याने आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली.

या बंदमुळे मुधोळ-महालिंगपूर-चिक्कोडी या मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बस सेवा बंद असल्याने कामावर जाणारे प्रवासी, महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले. सरकारने या आंदोलनाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात येत होती.

सरकारने आमच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक उग्र केले जाईल. महालिंगपूर तालुका होणे हा या भागातील जनतेचा हक्क आहे, असे तालुका संघर्ष समितीच्या सदस्यांनी म्हटले.

सरकारने आमच्या भावनांशी खेळू नये आणि लवकरात लवकर महालिंगपूर तालुका घोषित करावा, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.

Tags: