लोंढा येथील लोंढा हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या लोंढा परिसरातील चार माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

लोंढा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक नेसरीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष अशोक नेसरीकर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे किशोर हेब्बाळकर यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे पूजन आणि क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना किशोर हेब्बाळकर यांनी आरोग्यम धनसंपदा या उक्तीचा आधार घेत प्रत्येक विद्यार्थ्याने खेळ खेळणे आवश्यक असल्याचे सांगितले. सध्याच्या काळात मोबाईलकडे लक्ष न देता मैदानी खेळांच्या माध्यमातून आपले शरीर सुदृढ बनवणे ही काळाची गरज आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

या सोहळ्यात लोंढा हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रदीप डिगेकर, आकाश घाडी, लक्ष्मण गावडे आणि सदानंद देसाई या चार अग्निवीरांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. देशसेवेसाठी सज्ज झालेल्या या पुत्रांच्या यशाबद्दल यावेळी कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात लोंढा हायस्कूलच्या नूतन सदस्यांचे शाळेच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. जनरल सेक्रेटरी साक्षी सावर्डेकर आणि एल. आर. मुक्तेश्वरी या विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी संतोष भूतकी, नरेंद्र नाईक, बाबुलाल पटेल, सुरेश देसाई, विनय महालंग, पत्रकार वसंत काळगे आणि विजयकुमार हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण गावडे आणि एन. डी. पाटील यांनी केले, तर जाफर पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Recent Comments