बागलकोट शहरातील मुरारजी कन्या निवासी शाळेतील १० वीच्या चार विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्यामुळे बागलकोटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बेपत्ता झालेल्या या विद्यार्थिनी आज पहाटे विजापूर बसस्थानकावर आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.


काल संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वसतिगृहात असलेल्या चार विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. या विद्यार्थिनी वसतिगृहाची संरक्षक भिंत ओलांडून बाहेर गेल्याचे बोलले जात आहे.


वसतिगृहाचे मुख्याध्यापक, वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणाच विद्यार्थिनी पळून जाण्यास कारणीभूत ठरला, असा आरोप केला जात आहे. विद्यार्थिनी बेपत्ता झाल्यानंतर चार-पाच तासांनी वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेतली. कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बागलकोट येथील महिला पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत विद्यार्थिनींचे मोबाईल लोकेशन शोधण्यात यश मिळवले.
पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनी आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास विजापूर बसस्थानकावर सापडल्या. विद्यार्थिनी बेपत्ता होण्याची कारणे काय आहेत आणि त्या विजापूरला का गेल्या होत्या, याबद्दल पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसेच, वसतिगृहाचे कर्मचारी आणि वॉर्डन यांच्या निष्काळजीपणाबद्दलही कारवाई होण्याची शक्यता आहे.


Recent Comments