Bagalkot

सुविधांच्या अभावामुळे इंदवार ग्रामस्थ संतप्त

Share

विकासाचा जप करणाऱ्या सरकारला बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील इंदवार गावाने आरसा दाखवला आहे. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या गावातील नागरिक आता पंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध संतापले आहेत.

गावातील रस्ते अक्षरशः जंगलासारखे झाले आहेत. सर्वत्र काटेरी झुडपे वाढली असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते आहे. गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. योग्य गटारे नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे, ज्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. गावातील सरकारी शाळेची इमारत देखील मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. मुलांचे भविष्य अंधारात आहे. विकासासाठी येणारा निधी कुठे जातोय? पीडीओ काय करत आहेत? असे प्रश्न शेतकरी संघटनेचे नेते आणि ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

गावात विकास कामे सुरू होईपर्यंत ‘घरपट्टी भरणार नाही’ असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. “विकास करायचा नसेल तर सरकार, पंचायत आणि पीडीओ आम्हाला कशाला हवे आहेत?” अशा शब्दांत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Tags: