देशसेवेत कार्यरत असलेले बागलकोट जिल्ह्यातील एक वीर जवान दिल्लीत झालेल्या रस्ते अपघातात शहीद झाले आहेत.

बदामी तालुक्यातील आडगळ गावातील दुर्गाप्पा मादर हे शहीद झालेले जवान दिल्लीतील आर्मी रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना झालेल्या रस्ते अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने दिल्लीतील आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. २०१० मध्ये ते भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांनी बेंगळुरू येथील एमईजी सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले होते. बेंगळुरू आणि अलाहाबाद येथे सेवा केल्यानंतर ते दिल्लीत कार्यरत होते.
ग्रामदेवतेच्या कार्तिकोत्सवात सहभागी होण्यासाठी दुर्गाप्पा यांनी १० डिसेंबर रोजी सुट्टी घेतली होती. मात्र, घरी परतण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. शहीद जवानाच्या पश्चात पत्नी पूजा, आई आणि बहीण आहेत. जवानाच्या निधनामुळे आडगळ गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
शहीद जवानाचे पार्थिव शरीर आज सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पोहोचणार असून, उद्या शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.


Recent Comments