Bagalkot

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’वर के.एस. ईश्वरप्पा भडकले!

Share

राज्य काँग्रेस सरकारच्या प्रशासनावर आणि अंतर्गत गटबाजीवर बागलकोट येथे माजी उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते के.एस. ईश्वरप्पा यांनी तीव्र हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील समन्वय बैठकांवर त्यांनी उपरोधिक टीका केली असून, राज्यात कोणत्याही विकासाची कामे होत नसल्याची तक्रार केली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ वर टीका करताना ईश्वरप्पा यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी म्हटले की, हायकमांडच्या आदेशाशिवाय राज्यात विकासाची कामे करायची नाहीत, असे सरकारने ठरवले आहे काय? सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही विकासकाम झाले नसून, राज्यात सरकारच अस्तित्वात नाही, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. सत्ताधारी आमदारांनी मंत्रीपदाच्या आकांक्षा व्यक्त करण्याऐवजी जनतेच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

बिहारमधील निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत ईश्वरप्पा यांनी राज्यातील काँग्रेसच्या भवितव्याबद्दल भाकीत केले. बिहारप्रमाणेच राज्यातही काँग्रेसला भविष्यात एकेरी आकड्यावर यावे लागेल, असा दावा त्यांनी केला. महात्मा गांधींच्या ‘काँग्रेस विसर्जनाच्या’ स्वप्नाचा उल्लेख करून, देशभरातून काँग्रेस पक्ष विसर्जित होत असून, आगामी निवडणुकीत राज्यातील मतदारही काँग्रेसला विसर्जित करतील, असा दावा त्यांनी केला.

Tags: