बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथे ऊस दराच्या निश्चितीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पालकमंत्री आर.बी. तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली मुधोळ शहरातील विश्रामगृहात आयोजित केलेली शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या मालकांची बैठक कोणत्याही निर्णयाशिवाय अपयशी ठरली.

यावेळी कारखानदारांनी सरकारने घोषित केलेल्या दरालाच केवळ आम्ही बांधील राहू, असे स्पष्ट केल्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या ३,५०० रुपये दराच्या मागणीवर ठाम राहत बैठकीतून थेट बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी दुसरा हप्ता म्हणून ५०० रुपये देण्याची मागणी लावून धरली होती, परंतु मागील तीन वर्षांपासून कोणत्याही कारखान्याने दुसरा हप्ता दिला नसल्याचे यावेळी मंत्र्यांनी नमूद केले. परिस्थिती चिघळल्याने आणि तोडगा न निघाल्याने हा तिढा कायम राहिला आहे.
बैठक अयशस्वी झाल्यानंतर बोलताना मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी, आंदोलनकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या दरावर सहमत होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी मात्र त्यांची मागणी असलेले ३,५०० रुपये आणि ५०० रुपयांचा दुसरा हप्ता यावर पुनरुच्चार केला. यावर कारखानदार मालकांनी सरकारी आदेशानुसार दर देण्यास तयार असल्याचे सांगितले. तरीही, मंत्री तिम्मापूर यांनी पुन्हा एकदा कारखानदारांशी बोलून शेतकरी आणि मालक यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. हा तिढा लवकरच सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.


Recent Comments