बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जारकीहोळी कुटुंबातील युवा नेत्यांनी जरी सक्रिय प्रवेश केला असला तरी, या बँकेचे अध्यक्षपद लिंगायत समाजाकडेच राहील, या भूमिकेवर आमदार भालचंद्र जारकीहोळी ठाम राहिले आहेत.

बँकेच्या उभारणीत लिंगायत समाजाचे मोठे योगदान असल्यामुळे हा निर्णय कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कौटुंबिक राजकारणावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना, हा केवळ जारकीहोळी कुटुंबाचा नाही, तर देशाच्या आणि जिल्ह्याच्या इतिहासाचा भाग आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील प्रतिष्ठित डिसिसी बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, जारकीहोळी आणि हेब्बाळकर गटाने एकवटून आपली राजकीय ताकद दाखवली. जारकीहोळी कुटुंबातील दोन युवकांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. बेळगाव तालुका संचालक पदासाठी राहुल जारकीहोळी आणि गोकाक तालुका संचालक पदासाठी अमरनाथ जारकीहोळी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्यासह, मुदळगी तालुका संचालक पदासाठी नीळकंठ कप्पलगुद्दी आणि इतर संचालक पदासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनीही अर्ज भरला. राहुल आणि अमरनाथ यांना त्यांचे काका आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची साथ लाभल्यामुळे डिसिसी बँक निवडणुकीचा हा आखाडा अधिकच रंगतदार बनला आहे.
यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की, “सहा इच्छुक उमेदवार असले तरी, आम्ही योग्य समन्वय साधून चन्नराज हट्टीहोळी यांना इतर क्षेत्रासाठी रिंगणात उतरवले आहे. सर्वांच्या आशीर्वादाने आमचे पॅनेल निश्चितच सत्तेत येईल. बिनविरोध होणाऱ्या जागांवरही विनाकारण इतरांना निवडणुकीत उभे केले जात आहे. मात्र, कुणीही कोणाला उभे केले तरी विजय आमचाच आहे. उत्तम पाटील यांना त्यांचे बंधू सतीश जारकीहोळी आणि आम्हीही निवडणुकीत न उतरण्यास सांगितले आहे. आजही आम्ही त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कित्तूर मतदारसंघात विक्रम इनामोदार आमचे उमेदवार असून, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महेश कुमठळ्ळी आणि श्रीमंत पाटील यांच्याबाबत बोलताना, त्यांच्याशी आमचा संबंध नाही. आम्हाला न विचारता त्यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, अन्यथा निवडणुका घेऊ. राहुल आणि अमरनाथ जारकीहोळी यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना,
“शेवटच्या क्षणी होणाऱ्या बदलांनाच राजकारण म्हणतात. आमच्या कुटुंबातील दोघे सदस्य संचालक म्हणून आले असले तरी, आमच्या निर्णयामध्ये कोणताही फरक पडणार नाही. लिंगायत समाजाचेच डिसिसी बँकेचे अध्यक्ष असतील. मुरुगोडच्या आज्जनवर यांच्या माध्यमातून डिसिसी बँकेला लिंगायत समाजाचे मोठे योगदान लाभले आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
आमदार लक्ष्मण सवदी यांच्या सूर्य आणि चंद्र या विधानाबद्दल बोलताना, ते म्हणाले, लक्ष्मण सवदी यांनी ते कोणत्या अर्थाने म्हटले आहे, हे मला माहीत नाही. अथणी आणि कागवाड तालुक्याशी आमचा थेट संबंध नाही. सर्व प्रक्रिया सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हुक्केरी येथील निवडणूक आणि या निवडणुकीची तुलना करणे योग्य नाही. कुटुंबवाद केवळ आमच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही. जिल्ह्याचा इतिहास काढून पाहा, देशाच्या इतिहासातही तुम्हाला कुटुंबवाद दिसेल. आम्ही सुरू केलेला हा रथ मध्येच सोडणे शक्य नाही. जनतेचा आशीर्वाद असेपर्यंत आम्ही राजकारण करत राहू. आशीर्वाद नको झाला, तर घरात शांतपणे बसू,” असे त्यांनी निक्षून सांगितले.
यावेळी हुक्केरी मतदारसंघातून राजेंद्र पाटील निवडणूक लढवत असून, आम्ही गांभीर्याने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. उर्वरित निर्णय मतदारांवर अवलंबून आहे. मतभेद थांबवणे कुणालाही शक्य नाही. चन्नराज हट्टीहोळी सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुढे आले आहेत. त्याचा आणि इतर राजकीय संघर्षाचा कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी नमूद केले.


Recent Comments