भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम केले आहे. याच मुद्यावरून काँग्रेसने येत्या २२ ऑगस्ट रोजी भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष विनय कुमार सोरके यांनी बुधवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी विनय कुमार सोरके म्हणाले, “२० हजारांपेक्षा जास्त रकमेचा तपशील आम्ही दिला आहे. त्याचा अहवालही आम्ही सादर केला आहे. आमच्या नेते राहुल गांधी यांनी एका संशोधन पथकाच्या माध्यमातून कागदपत्रे आणि पुराव्यांसह पत्रकार परिषद घेऊन ही माहिती उघड केली.”
सोलापूरमध्ये अमित शहा यांनी घेतलेल्या सभेचा दाखला देत विनय कुमार सोरके म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मी प्रभारी असताना सोलापूर येथे अमित शहा यांनी एक सभा घेतली होती. त्यात त्यांनी तुम्ही कितीही मते द्या, असे आवाहन केले होते.” त्याचाच परिणाम म्हणून गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सहा महिन्यांत ४१ लाख मतदारांची वाढ झाली. तसेच, बिहारमध्ये ६१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी १८०० किलोमीटरची भारत जोडो यात्रा करत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र मागत आहे. आम्ही पुरावे आणि आधार दिले असताना प्रतिज्ञापत्र देण्याची काय आवश्यकता, असा सवाल सोरके यांनी विचारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क हिरावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘गांधी भारत’ या नावाने सरकार आणि पक्षाला समोर ठेवून काम करण्यासाठी एक वर्षाचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, असेही सोरके यांनी नमूद केले.


Recent Comments