अंतर्गत आरक्षणाची मागणी करत बेळगावात मादिग फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

अंतर्गत आरक्षणाला विलंब होत असल्यामुळे मादिग समाजातील विद्यार्थी, नोकरदार, कामगार आणि महिला त्यांच्या हक्कांपासून वंचित राहत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला. सरकारने या संदर्भात केवळ आश्वासन दिले असून, आता तो समाजावर अन्याय करत आहे, असेही ते म्हणाले.
या अन्यायाचा निषेध करत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे नेते मिलिंद ऐहोळे म्हणाले की, ‘अंतर्गत आरक्षणावर १६ ऑगस्ट रोजी विधानसभेत चर्चा होईल, असे आश्वासन सरकारने दिले होते, पण ती आता १९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जर याला असाच विलंब झाला तर मादिग समाजाच्या रोषाला सरकारला नक्कीच सामोरे जावे लागेल.’ मादिग समाज शांतताप्रिय असला तरी, जर त्यांच्यावर अन्याय झाला तर सरकारला सत्ता गमवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
‘जर अंतर्गत आरक्षण लागू झाले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून रक्त क्रांती करू’, असेही ते म्हणाले. ‘सरकारने दिलेली मुदत पाळली नाही, तर आमचा हक्कांसाठी राज्यभरातील अनुसूचित जातीचे विद्यार्थी, कामगार, वकील आणि महिला एकत्र येऊन आंदोलन अधिक तीव्र करतील’, असेही ते म्हणाले. या आंदोलनात एम.आर.एच.एस उदय रेड्डी, श्रीकांत मादर, परशुराम वांटमुरी, बसवराज दोडमनी, यमनप्पा रत्नाकर, बिस्तप्पा मादर, विष्णू एस. इंगळी, अरविंद कोलकार, फकीरप्पा हरिजन आदी उपस्थित होते.


Recent Comments