समाजात समान सन्मान आणि हक्कांबाबत जागृती करण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बेळगावात एलजीबीटीक्यू समुदायाच्या वतीने प्राइड रॅली काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जनजागृती करण्यात आली.

यावेळी निवारा आणि सरकारी कागदपत्रांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही सुविधा मिळत नसल्याबद्दल तृतीयपंथीयांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.

बेळगावातील कन्नड साहित्य भवन परिसरातून मान्यवरांच्या हस्ते रॅलीला सुरुवात झाली. राणी चन्नम्मा सर्कलमार्गे कुमार गंधर्व कलामंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात आली. मागील रविवारी आयोजित ‘राइड फॉर प्राइड’ कार्यक्रमाच्या पुढील भाग म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील सकारात्मक निर्णयाबद्दल आभार व्यक्त करण्यासोबतच एलजीबीटीक्यू समुदायाचे हक्क आणि समस्यांबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. यावेळी समुदायाच्या सदस्यांनी राहण्यासाठी निवारा तसेच ओळखीसाठी आधारकार्ड आणि रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी आपल्या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारी कागदपत्रांसाठी अधिकारी अनेक महिने कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लावत असून, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारकडून मिळणाऱ्या अल्प आर्थिक मदतीत घरभाडे आणि वैद्यकीय खर्च भागविणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगावातील अधिवेशनाच्या काळातही आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
शेतकरी, महिला आणि आशा कार्यकर्त्यांच्या आंदोलनांना आपण पाठिंबा देत असतानाही आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही मदतीला येत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. काही बनावट व्यक्तींच्या कृत्यांमुळे संपूर्ण समुदायाची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत सरकारने तातडीने निवारा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या रॅलीत तृतीयपंथीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments