Belagavi

स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी राजकीय फायद्यासाठी की जनहितासाठी? नागेश गोळशेट्टी यांचे भालचंद्र जारकीहोळी यांना आव्हान

Share

स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याबाबत अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केलेल्या विधानाचे स्वागत आहे. मात्र, हे विधान केवळ राजकीय फायद्यासाठी केले आहे की उत्तर कर्नाटकातील जनतेच्या हितासाठी, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी नागेश गोळशेट्टी यांनी केली.

बुधवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. उमेश कत्ती यांच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीचा उल्लेख करत आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी स्वतंत्र राज्य झाल्यास आपलाही पाठिंबा असेल, असे मत व्यक्त केले होते. आता त्यांना उत्तर कर्नाटकावरील अन्यायाची जाणीव झाली असेल, असे आम्हाला वाटते. खरोखरच उत्तर कर्नाटकातील सुमारे तीन कोटी जनतेच्या हितासाठी ते स्वतंत्र राज्याच्या बाजूने असतील, तर त्यांनी आपल्या विधानावर ठाम राहून पुढील आंदोलनासाठी तयार व्हावे. तसे झाल्यास त्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊन तिचा आदर करू, असे आव्हान नागेश गोळशेट्टी यांनी दिले.

२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील शेती, शिक्षण, सिंचन, रस्ते, वाहतूक, रेल्वे, प्रसारमाध्यमे, उद्योग, चित्रपटसृष्टी, पर्यटन तसेच राजकीय क्षेत्रातील अन्यायाविरोधात आवाज उठवून न्यायासाठी लढा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ऊसासह विविध पिकांना योग्य हमीभाव मिळावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही आवाज उठवण्यात येईल. विद्यार्थी, आशा कार्यकर्त्या, महिला, युवक आणि कामगार वर्गाला स्वावलंबी व स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी रोजगारनिर्मितीसह विविध मागण्या सरकारसमोर मांडण्यात येतील. सर्व संघटनांच्या सहकार्याने उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन उभारण्यात येईल, असे नागेश गोळशेट्टी यांनी सांगितले.

Tags: