ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी बेळगावात होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी अडथळा निर्माण केला आहे. मुक्तिमठातून हिंडलगा कारागृहाकडे पदयात्रेने निघालेले शेतकरी नेते शशिकांत गुरूजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात ऊस उत्पादकांचे आंदोलन तीव्र होत असताना मुक्तिमठातून हिंडलगा कारागृहाच्या दिशेने आंदोलनात्मक पदयात्रा काढण्यात आली होती. मात्र, मार्गातच गोकाकचे डीवायएसपी आणि मूडलगीचे सीपीआय यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी शशिकांत गुरूजी यांना ताब्यात घेतले.

यावेळी बोलताना गुरूजी यांनी सरकार शेतकऱ्यांच्या न्याय्य आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. राज्यातील विविध तालुके आणि जिल्ह्यांमधील ज्येष्ठ शेतकरी नेत्यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेऊन आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, बेळगाव शहर आणि परिसरात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बेळगावच्या दिशेने येऊ नये, असे आवाहन शशिकांत गुरूजी यांनी केले. कोणीही बेकायदेशीर कृत्य करू नये आणि शांतता राखावी, असेही त्यांनी सांगितले. सायंकाळी ४ वाजता सोशल मीडियावरून थेट संवाद साधून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


Recent Comments