बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर ७१ वा कन्नड राज्योत्सव पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ध्वजारोहण करून भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पोलीस दल, विविध सुरक्षा पथके तसेच शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. शिस्तबद्ध संचलन आणि बँड पथकांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली.


यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी ७१ व्या कन्नड राज्योत्सवानिमित्त कवी, साहित्यिक आणि लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. मुंबई, मद्रास, हैदराबाद आणि म्हैसूर प्रांतांतील कन्नड भाषिकांना एकत्र आणून १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल म्हैसूर राज्याची निर्मिती होण्यासाठी योगदान देणारे आळूर वेंकट राय आणि केंगल हनुमंतय्या यांच्यासारख्या नेत्यांच्या कार्याचे त्यांनी स्मरण केले.

यंदा विविध क्षेत्रांतील ७१ जणांना राज्योत्सव पुरस्कार जाहीर झाले असून, त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील तिघांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शिल्पकला क्षेत्रातील गौडप्पा परशुराम बंडिवड्डर, साहित्य क्षेत्रातील डॉ. जी. एस. शिवगळी आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुजाता जाळी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यलढा आणि एकीकरण चळवळीत बेळगाव जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.

यावेळी शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती आणि समाजसेवा यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. एच. आर. तिम्मापूर, बसवराज कुप्पसगौडर, ए. ए. सनदी, वीरेश हिरेमठ, मैत्रायिणी गदिगेप्पगौडर, महाराज सिद्धू हल्लूर, इस्माईल पीरजादे, आयेशा सनदी, दुर्गेश मेत्री, पंचाक्षरी गड्डी, उमेश कलघटगी आणि होळेप्पा नेसरगी यांचा गौरव करण्यात आला.

मुद्रित माध्यम विभागात ऋषिकेश बहाद्दूर देसाई, ब्रह्मानंद हडगली आणि इमामहुसेन गूडुनवर, तर इलेक्ट्रॉनिक माध्यम विभागात मायलारी पटात, लोहित शिरोळ, अडिवेप्पा पाटील आणि सदाशिव जाधव यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा आणि प्रादेशिक दैनिक संपादक विभागात शरतचंद्र देसाई व राजकुमार टोपण्णवर, तालुका वार्ताहर विभागात राजू गाली व के. एम. कर्नाची, तर वृत्तपत्र विक्रेता विभागात भीमाप्पा कोतेकर यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस आयुक्त निकम प्रकाश अमृत, प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments