Belagavi

अनधिकृत लेआउटला परवानगी दिल्यास पीडीओंवर कारवाई

Share

बेळगाव तालुक्यातील मुतगा ग्रामपंचायतीला उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध नोंदी तपासून अधिकाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत लेआउट आढळल्यास संबंधित लेआउट मालक आणि परवानगी देणाऱ्या पीडीओंविरोधातही गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कंत्राटदारांनी जीएसटी नोंदणी करणे आणि कामाच्या पावत्या देणे बंधनकारक आहे. व्यवहारात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर लोकायुक्त कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अंगणवाडी केंद्राला भेट

उपलोकायुक्तांनी मुतगा येथील अंगणवाडी केंद्रालाही भेट देऊन सेविकांकडून माहिती घेतली. स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करताना काळजी घ्यावी आणि धोकादायक वस्तू मुलांपासून दूर ठेवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. गर्भवती महिलांना अंडी, मुलांना पौष्टिक आहार आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य नियमितपणे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुलांचे भोजन आणि गर्भवती महिलांच्या पोषण आहारासह आवश्यक सुविधांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशाराही बी. वीरप्पा यांनी दिला.

यावेळी लोकायुक्त उपनिबंधक अरविंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, बेळगाव लोकायुक्त अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: