बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ऊस उत्पादकांची बैठक निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकार आणि कारखानदारांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी उद्या कन्नड साहित्य भवन येथे शेतकऱ्यांची निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली असून, तीव्र आंदोलनाचा इशारा राघवेंद्र नाईक यांनी दिला.
सुवर्णसौधमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने ऊस उत्पादकांमध्ये संताप आहे. २६ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू होतील, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे शेतातील ऊस वाळत असल्याने कारखाने तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. प्रभाकर कोरे आणि निखिल कत्ती यांच्यासह अनेक नेते केवळ बोलण्यातून शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे दाखवतात; प्रत्यक्षात मदत करत नसल्याचा आरोप शेतकरी नेते राघवेंद्र नाईक यांनी केला.

कारखानदार मोठा नफा कमावत असतानाही ऊस वाहतुकीच्या वजनात प्रत्येक खेपेमागे दोन ते तीन टन कपात करून शेतकरी आणि ट्रॅक्टरमालकांचे नुकसान केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. किमान आधारभूत किंमत आणि रिकव्हरीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे शेतकरी नेते सुरेश परगोंड यांनी सांगितले. रात्रंदिवस धरणे आणि उपोषण करूनही सरकार दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या सर्व प्रकारांचा निषेध करण्यासाठी उद्या कन्नड साहित्य भवन येथे ऊस उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील तीव्र आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.
यावेळी शेतकरी नेते सुरेश परगन्नवर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


Recent Comments