बेळगावातील दुर्गामाता दौड आणि गणेशोत्सवादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्याचा इतिहास दर्शवणारे फ्लेक्स लावणाऱ्या तरुणांवर पोलीस कारवाई केल्याबद्दल बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. इतिहास दर्शवणाऱ्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कर्नाटक सरकारच्या इयत्ता ६ वीच्या कन्नड पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक ६८ आणि ६९ वर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्याच्या इतिहासाचा स्पष्ट उल्लेख आहे. सरकारनेच आपल्या पाठ्यपुस्तकात अधिकृतपणे दिलेले चित्र व माहिती तरुणांनी दाखवली, तर बेळगाव पोलीस आणि प्रशासनाला त्रास का होत आहे? असा रोखठोक सवाल आमदार अभय पाटील यांनी विचारला आहे. सणांच्या काळात देशाचा खरा इतिहास सांगणाऱ्या युवक मंडळांना आणि धार्मिक भावनांना लक्ष्य करून त्रास देणे योग्य नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दुर्गामाता दौड आणि गणेशोत्सवाच्या वेळी हे फ्लेक्स हटवून काही तरुणांवर एफआयआर दाखल करू पाहणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेबद्दल अभय पाटील यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. तरुणांवर अनावश्यक कायदेशीर कारवाई करणे तात्काळ थांबवावे, अशी विनंती त्यांनी पोलीस आणि सरकारला केली आहे. इतिहासप्रेमी तरुणांवर असा अन्याय सुरूच ठेवल्यास जनता आणि तरुणांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.


Recent Comments