समस्त अॅपमुळे वाढणारा कामाचा ताण, डेटा भत्त्यात केलेली कपात आणि मानधन वितरणातील गोंधळ याविरोधात बेळगावात आज आशा कार्यकर्त्यांनी भव्य निषेध मोर्चा काढून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आशा कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला.
मानधनात कायमस्वरूपी वाढ करावी, ऑनलाईन अॅपमुळे वाढणारा अतिरिक्त ताण थांबवावा आणि आरसीएम पोर्टलवरील मानधन समस्या दूर करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पूर्वी दिला जाणारा २५० रुपयांचा डेटा भत्ता रद्द करून आता कर्मचाऱ्यांवरच दबाव आणला जात आहे. तसेच ऑनलाईन सर्व्हे आणि लसीकरणाची नोंदणी करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने जिल्हा सचिव गीता रायगोळ यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात १०,००० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप लागू झाले नाही. त्यातच समस्त अॅपद्वारे मिळणारे मानधन वेळेवर न मिळता त्यात गोंधळ निर्माण होत असल्याने संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून १,००० ते २,००० आशा कार्यकर्त्या एकत्र आल्याचे अथणी तालुक्यातील मदभावी येथील सुरेखा विजय कांबळे यांनी सांगितले.
राज्यभरातील आशा कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान आंदोलन सप्ताह पाळण्यात येत आहे. आशा कार्यकर्त्यांना दरमहा १५,००० रुपये निश्चित मानधन मिळावे, योग्य मोबाईल किंवा डेटा न देता समस्त अॅपद्वारे ऑनलाईन काम करण्याचा दबाव थांबवावा आणि ३-४ महिन्यांपासून थकलेले मानधन त्वरित वर्ग करावे, अशी मागणी आशा संघटनेचे प्रमुख के. सोमशेखर यादगिरी यांनी केली.
या वेळी हजारोच्या संख्येने आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments