Belagavi

महांतेशनगर येथे बसस्थानक उभारण्याची मागणी

Share

बेळगाव उत्तर क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणारी वाहतूक कोंडी व बस सेवेतील अडचण दूर करावी, या मागणीचे निवेदन ‘न्यायवेंब बेळकू’ संस्थेच्या वतीने वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाला देण्यात आले.

बेळगाव येथील महांतेशनगर ओव्हरब्रिजवरून जाणाऱ्या बैलहोंगल, सौंदत्ती, धारवाड आणि बेंगळुरू मार्गावरील बसेसचा मार्ग बदलण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. इंधन बचतीचे कारण सांगून जुन्या पी. बी. रस्त्यावरून बसेस वळवण्यात आल्याने महामंडळाचा महसूल घटल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर पूर्ववत जुन्या मार्गाने म्हणजेच महांतेशनगर ओव्हरब्रिजवरूनच बसेस सुरू कराव्यात आणि तिथे कायमस्वरूपी बसस्थानक उभारावे, अशी मागणी ‘न्यायवेंब बेळकू’ संस्थेचे अध्यक्ष वकील सुनील साणिकोप्प यांनी केली आहे.

तसेच महांतेशनगरहून वडगाव, टिळकवाडी आणि अनिगोळच्या दिशेने बंद असलेली बस सेवा पुन्हा सुरू करावी आणि किल्ला तलाव लेकव्ह्यू रुग्णालयाजवळील धोकादायक वळण बंद करावे, अशी विनंतीही करण्यात आली.

यावेळी सुनील साणिकोप्प, जयशंकरय्या एस. सुंकदमठ, अशोक शिवबसप्पा बुर्गे, कासय्या मल्लय्या हिब्बळीमठ आणि पुरप्पा सिद्धेश्वर कागतीकर उपस्थित होते.

Tags: