Belagavi

बेळगावात ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान यशस्वी

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या २४ वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता हीच सेवा’ कार्यक्रम पार पडला.

बेळगाव येथील गांधी सर्कल आणि वेंगुर्ला रोड परिसरात ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या संकल्पनेअंतर्गत स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात आली. खासदार जगदिश शेट्टर यांनी यात सहभागी होऊन स्वच्छता आणि वृक्षारोपण ही निरंतर प्रक्रिया असणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात बेळगाव छावणी मंडळाचे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार सुधाम हरिविजय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, माजी लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगर स्वच्छ ठेवण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, मानवी साखळी तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक संदेश देण्यात आला.

या प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, एम. बी. जिरली, डॉ. रवी पाटील, भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, उज्ज्वला बडवण्णाचे, छावणी मंडळाचे माजी सदस्य साजिद शेख, राहीला शेख, रिझवान बेपारी, छावणी मंडळाचे अभियंता सतीश मन्नोळकर, चंद्रशेखरय्या सावडी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Tags: