नंदगडच्या धर्तीवर कित्तूर येथेही ३० कोटी रुपये खर्चाचा भव्य थीम पार्क उभारण्यासाठी योजना तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.


सोमवारी कित्तूर येथील वीर राणी कित्तूर चन्नम्मा भवनात बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कन्नड व संस्कृती खात्याच्या वतीने आयोजित ‘चन्नम्मा कित्तूर उत्सव’ पूर्वतयारी बैठकीत मंत्री सतीश जारकीहोळी बोलत होते. कचरा विल्हेवाटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाहनांची गरज असून स्वच्छता ही केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात सर्वांच्या सहकार्याने राखली जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एस. बंगारप्पा मुख्यमंत्री असताना स्थानिक जनतेच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उत्सवाला आता राज्य सरकारकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर कर्नाटकातील या ऐतिहासिक कित्तूर उत्सवाचे उद्घाटन राजकीय नेत्यांऐवजी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंतांच्या हस्ते करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या काकती गावालाही कित्तूरप्रमाणेच महत्त्व दिले जाईल आणि तेथेही उत्सवाच्या निधीतून कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी यंदा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून प्रति किलोमीटर १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला जाईल, असे निर्देश त्यांनी दिले.
आमदार बाबासाहेब पाटील यांनी गेल्या वेळेतील त्रुटी सुधारून यंदाचा उत्सव अधिक नियोजनबद्ध रीतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या इच्छेनुसार स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल आणि शालेय विद्यार्थ्यांना कित्तूरच्या इतिहासाची माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पूर्वतयारी बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, बैुलहोंगलचे डीवायएसपी वीरय्या हिरेमठ, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांच्यासह कित्तूर संस्थान आणि नुच्चनकी मठाचे स्वामीजी उपस्थित होते.


Recent Comments