मतचोरीला मदत केल्याचा आरोप करत भारतीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज बेळगावात ग्रामीण आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.


आज बेळगावातील आर.टी.ओ. संगोळी रायण्णा चौकाजवळील काँग्रेस भवनापासून आंदोलनाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत निघालेली मिरवणूक कोर्ट चौकाजवळ पोहोचली. यावेळी भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकृतीचे दहन करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.


एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी बोलताना देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा निषेध केला. त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली. एस.आर.च्या मुद्द्यावर १४ वेळा सूचना देऊनही संविधानाच्या विरोधात लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात फेरनिवडणूक तसेच कर्नाटकात पुन्हा एस.आय.आर. प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

केपीसीसी सदस्य मलागौडा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला. बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आरबीआयमधील अधिकार बदल, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या तसेच मतदारांची नावे हटवण्याचे पद्धतशीर षड्यंत्र केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. मतदार यादीत घोळ करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, महिला काँग्रेसच्या नेत्यांनी ज्ञानेश कुमार तसेच भाजप सरकारविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्ञानेश कुमार यांची भूमिका थेट भाजपच्या हातातील बाहुले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आज सुरू असलेली आंदोलने आणि जनजागृतीच्या माध्यमातून जनतेचा मूलभूत मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला. भाजप आणि निवडणूक आयोगाच्या एकतर्फी निर्णयांमुळे तसेच त्रुटींमुळे सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा नेत्यांनी तीव्र निषेध करत आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार जपण्यासाठी अशी आंदोलने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष राजा सलीम काशम्मनवर, ग्रामीण अध्यक्ष बसवराज शेगावी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments