Belagavi

गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याचे पोलिसांचे आवाहन

Share

बेळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

गेल्या वर्षी विसर्जनासाठी तब्बल ३६ तास लागले होते. त्यामुळे यंदा मिरवणूक रात्री ८ च्या आत सुरू करून वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी गणेश मंडळांना केले आहे. विसर्जनासाठी मंडळांनी आपापसांत स्पर्धा करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बाहेरून मागवलेले ५ हजार आणि स्थानिक असे मिळून एकूण ६ ते ७ हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सुरक्षेचा भाग म्हणून ५०० नवीन कॅमेऱ्यांसह एकूण १,१०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरात बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच वाहतूक व महावितरणच्या समन्वयासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता उत्सव शांततेत साजरा करावा आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Tags: