लिंगायत धर्माची तत्त्वे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे प्रत्यक्ष आचरण करणे यातूनच धर्माची प्रभावी अंमलबजावणी शक्य आहे, असे प्रतिपादन नागनूर रुद्राक्ष मठाचे पीठाधीश डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी यांनी केले.


बेळगाव येथील एस. जी. बाळेकुंद्री तंत्रनिकेतनच्या सभागृहात आयोजित जागतिक लिंगायत महासभेच्या दोन दिवशीय वार्षिक सर्वसाधारण सभा व राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. लिंगधारणा, रुद्राक्ष धारणा आणि लिंगपूजा यांसारख्या आचारांचा प्रभावी अवलंब करून लिंगायत स्वतंत्र धर्माला विरोध करणाऱ्यांचे मतपरिवर्तन केले जाऊ शकते, असे श्रींनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक करताना महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. एस. एम. जामदार यांनी, बसवकल्याण येथे सुमारे ५६० कोटी रुपये खर्चाच्या अनुभव मंटपाच्या भव्य इमारतीचे काम पुढील वर्षात पूर्ण होत असून, तेथे पुढील काळात कोणते उपक्रम राबवायचे यावर या बैठकीत ठोस निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तसेच या प्रसंगी लिंगायत धर्माशी संबंधित तीन महत्त्वाच्या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष एन. एस. केंपेगौडा होते. या सोहळ्याला निवृत्त आयएएस अधिकारी जी. व्ही. कोंगवाड, बसवराज रोट्टी, अशोक मळगली यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातील शेकडो पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.


Recent Comments