Khanapur

शिक्षक-कवी परशराम शिंदे यांच्या ‘गीतसंपदा’ अल्बमचे लोकार्पण

Share

शिक्षकाने अध्यापनासोबतच समाजाचे विविध पैलू आपल्या लेखणीतून मांडणे आणि कला-संस्कृती जपणे ही बाब कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ मिळते.

खानापूर तालुक्यातील हत्तरवाडचे सुपुत्र आणि हल्लेहोळ शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या नवीन ‘गीतसंपदा’ अल्बमचा लोकार्पण सोहळा साहित्यिक व सांस्कृतिक वातावरणात पार पडला. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या अल्बममध्ये गणेशगीत, भावगीत, भक्तिगीत आणि श्रमजीवींच्या जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या रचनांचा समावेश आहे.

खानापूर तालुका गट शिक्षण अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी मंजुनाथ हट्टी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुभाष देशपांडे आणि साहित्यिक वासुदेव चौगुले उपस्थित होते. कवी परशराम शिंदे यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचे त्यांनी कौतुक केले. शिंदे यांच्या या नवीन गाण्यांच्या संग्रहामुळे कला आणि संस्कृतीला नवीन दिशा मिळेल, अशी प्रतिक्रिया वक्त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला तबलावादक मेजर सुभेदार कृष्ण सुतार, संगीत दिग्दर्शक जयकर जाधव यांच्यासह शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

Tags: