बेळगावच्या सुवर्णसौध येथे आयोजित केडीपी बैठकीत पीक नुकसान, पिण्याचे पाणी आणि निधी वाटपातील भेदभावावरून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्णसौध येथे केडीपी बैठक पार पडली. या बैठकीत कापूस आणि कांदा पिकाच्या नुकसानीवर सविस्तर चर्चा झाली. सवदत्ती, यारगट्टी आणि रामदुर्ग तालुक्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, नियमानुसार बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनाच भरपाई मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली. तर, काही विशिष्ट बँकांमध्येच विम्याची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असून, राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार विश्वास वैद्य यांनी केली.

मुख्यमंत्री निधी वाटपात भागांनुसार भेदभाव केला जात असल्याचा आरोप बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केला. हनुमान नगर भागात खड्डे नसताना तीन लाख रुपये दिले गेले, तर खड्डे पडलेल्या छत्रपती शिवाजी नगरवर अन्याय केला जात असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर आक्षेप घेतला.
पिण्याचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये, असा इशारा विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी दिला. तसेच उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये, अशी मागणी आमदार महांतेश कौजलगी आणि आमदार विश्वास वैद्य यांनी केली. हिडकल आणि राकसकोप जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


Recent Comments