Belagavi

बुडा विरोधात कणबर्गीतील शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश

Share

बेळगावमधील कणबर्गी येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, ‘बुडा’ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.

कणबर्गी गावातील शेतकऱ्यांची सुमारे ६० एकराहून अधिक सुपीक जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. बुडा अध्यक्ष आसिफ सेठ, आयुक्त शकील अहमद, स्थानिक तहसीलदार आणि महसूल अधिकारी संगनमताने ७/१२ उताऱ्यावरील शेतकऱ्यांची नावे बेकायदेशीरपणे कमी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणतीही संमती नसताना जमिनी ताब्यात घेण्याची ५०:५० भूखंड वाटप योजना तात्काळ बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जमिनी आणि उपजीविका वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि सात दिवसांच्या आत योग्य ७/१२ उतारे पुन्हा नोंदवून द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जमिनींवरील अतिक्रमणाचा त्रास थांबला नाही, तर शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली बेळगाव भूमी अभिलेख आणि बुडा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Tags: