Belagavi

श्री महालक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेला २.८१ कोटी रुपयांचा नफा

Share

कल्लोळी येथील श्री महालक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात २.८१ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार ईरण्णा कडाडी यांनी दिली.

कल्लोळी येथे आयोजित संस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या वेळी बोलताना कडाडी यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. संस्थेकडे १७,७५० सभासद असून २५.५८ लाख रुपये भागभांडवल आणि १२.७१ कोटी रुपयांचा राखीव निधी उपलब्ध आहे.

गेल्या आर्थिक वर्षात संस्थेकडे १०७.९१ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, आजवर ९९.७२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच १८.६९ कोटी रुपये विविध बँका व संस्थांमध्ये गुंतवण्यात आले असून संस्थेचे खेळते भांडवल १२०.८८ कोटी रुपये झाले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर सभासदांना २० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.

संस्थेच्या या यशस्वी वाटचालीबद्दल संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग आणि भागधारकांचे ईरण्णा कडाडी यांनी आभार मानले. आगामी काळात संस्थेच्या विस्तारासाठी नवीन योजना राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्रीशैल तुप्पद, संचालक परप्पा मळवाड, सहदेव हेब्बाळ, बिडसीसी बँकेचे माजी संचालक सतीश कडाडी यांच्यासह संचालक मंडळ, सल्लागार समितीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: